आपल्या चांदवड कृषि उत्पन्न बाजार समितीचा सन 2023-24 या वर्षाचा वार्षिक अहवाल सादर करतांना मला आनंद होत आहे. बाजार समितीचे विद्यमान संचालक मंडळाने दि.23/05/2023 रोजी माझी सभापती म्हणुन बिनविरोध निवड करुन माझ्यावर जबाबदारी सोपविली आहे.
त्यानुसार दि.23/05/2023 पासुन मी सभापती म्हणुन बाजार समितीचे कामकाज सुरु केले असुन बाजार समितीची, शेतक-यांची व बाजार घटकांची प्रगती व्हावी, या एकमेव उद्देशाने मी व माझे सहकारी प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. शेतकरी हित नजरेसमोर ठेवत शेतक-यांच्या विकासाच्या दृष्टीने शेतकरी आपला शेतीमाल बाजार समितीमध्ये विक्रीसाठी घेऊन आल्यानंतर प्रथम येईल त्या प्राधान्याने त्याच दिवशी लिलाव, चोख वजनमाप व तात्काळ रोख रक्कम घेऊन घरी जाता यावे, या पद्धतीने कामकाज सुरु आहे. यात व्यापारी वर्गाचा देखील महत्वाचा सहभाग असुन दैनंदिन माल विक्रीनंतर व्यापारी वर्गामार्फत माल विक्रेत्यांना तात्काळ रोख स्वरुपात रक्कम अदा केली जाते. त्यामुळे तालुक्यातील, तालुक्याबाहेरील, तसेच जिल्ह्याबाहेरील शेतकरी चांदवड बाजार समितीत शेतीमाल विक्रीस प्रथम पसंती देत आहेत. त्यामुळे बाजार समितीचा 17 वा वार्षिक अहवाल सादर करतांना आनंद होत आहे.
तसेच बाजार समितीचे चांदवड मुख्य बाजार आवारात कांदा व भाजीपाल्याचे दैनंदिन लिलाव सुरु असुन भुसार शेतीमालाचे हंगामी लिलाव केले जातात. वडनेरभैरव येथे दैनंदिन भाजीपाला लिलाव सुरु आहे. नविन संचालक मंडळ कार्यान्वित झालेनंतर आम्ही वडाळीभोई येथे मुंबई-आग्रा महामार्गावर यश पेट्रोलपंपासमोर टोमॅटो व भाजीपाला शेतीमालाचे लिलाव सुरु केलेले आहेत.
वरीलप्रमाणे विविध विकास कामांचे नियोजन केलेले असुन सदर कामांना सुरुवात झालेली आहे. तसेच 1) मुख्य बाजार आवार, चांदवड येथे गट नं. 617/1/1 ब मध्ये कांदा लिलावासाठी सेलहॉलचे बांधकाम करणे व उपबाजार आवार, वडाळीभोई येथे नविन 34 गाळे बांधकाम करणे ही कामे मंजुर असुन निविदा प्रक्रिया सुरु आहे.
बाजार समितीचे व्यावहारिक दृष्टीकोन समोर ठेवून व शेतकरी हितास प्राधान्य देऊन शेतकरी, व्यापारी व कामगार यांना केंद्रबिंदु मानुन त्यांना बाजार आवारात आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याचे संचालक मंडळाने नियोजन व निर्धार केलेला आहे. बाजार समितीचे कामकाज अधिक सक्षम व पारदर्शी करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. सर्व सहकारी संचालक मंडळ, शेतकरी, व्यापारी, मापारी, हमाल, सभासद, सेवक वर्ग व अन्य सर्व हितचिंतक, तसेच विविध क्षेत्रातील राजकिय पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, जेष्ठ नेते, पत्रकार बंधु, विविध खात्याचे अधिकारी आदिंचे सहकार्य लाभत आहे. भविष्यात देखील आपणा सर्वांचे असेच अनमोल सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करतो व सर्वांचे सहकार्याबद्दल आभार मानुन माझे मनोगत पुर्ण करतो.